Wednesday, February 29, 2012

II रामरक्षा : मराठी पद्यानुवाद II RAMRAKSHA (MARATHI)


























रामरक्षा मराठी पद्यानुवाद
रामरक्षा स्तोत्र रची ऋषी श्री बुधकौशिक
देवता या मंत्राची शोभे श्रीसीताराम
शक्तीस्थानी देवी सीता छंद याचा अनुष्टुभ   
हनुमंत कीलक मात्री करीता याचे पठण
भक्ती मनी ठेवून हात दोन्ही जोडून
रामरक्षा स्तोत्र मंत्र ऐकता राम प्रसन्न


धरुनी शर धनुष्य दीर्घ  हस्ती सुरम्य
नेसूनी पीतांबर पद्मासनी सुहास्य
सीताशशीमुखावर कमलदलासमान
नेत्र विशाल लावून बैसला दयाघन
डाव्या मांडी जानकी साजश्रृंगार करून
पाहते टक लावून डोळां पाणी आणून
प्रगट जे रामवदन जटामंडलातून
ठसो मनी आपुल्या हे श्रीसीतारामध्यान


कोटी कोटी कडव्यांची कहाणी मोठी रामाची
एकेक अक्षरही तिचे नशि पापांच्या राशी 
स्मरा कमलनयन जटामुकुटधारी
कमलनीलकांती रामलक्ष्मणजानकी
खांदी धनु भाता पाठी विश्व  रक्षिण्यासाठी 
खड्ग सज्ज सदा हाती राक्षसवधासाठी
भूवनी प्रगटे प्रभू जन्मही न घेताची
लीला ही वाखाणावी सूज्ञाने राम भजूनी
रामरक्षा स्तोत्र हे वा पापविनाशी जपूनी
होतील सफल  साऱ्या इच्छा ज्या असती मनी

एकेक मम अंगाचे करो श्रीराम रक्षण
राखो शिर राघव भाळ दशरथनंदन
कर्ण विश्वामित्रप्रिय कौसल्यापुत्र नयन
नासिका वेदित्राता मुख सौमित्रवत्सल
राखो जिव्हा विद्यानिधी कंठ भरतवंदित
खांदे दिव्यायुधे राखो भुजा कार्मुकभंजक   
सीतापती हस्तद्वय परशुरामेश हृदय
धड राखो खरहंत नाभी जांबवनेश्वर
मांड्या मारुतीस्वामी राखो सुग्रीवेश कंबर
पोटऱ्या रघूत्तम राक्षसकुलविनाशक
राखो गुडघे सेतुकारी जांघा रावणमारक
चरण बिभिषणेश सकल काया श्रीराम


जपता हा सुमंत्र रामबले होई रक्षण
लाभे सुख दीर्घायू  संतती विजय विनय


पाताळी भूतळी व्योमी फिरती चर दुश्चर
दृष्टीसही त्यांच्या न पडे रामनामे जो रक्षित
घेता राम रामभद्र रामचंद्र हे श्रीनाम
टळे पाप मिळे सुख होई प्राप्त मोक्षपद
विश्वजीत रामनामे कंठी मंत्रित ताईत
बांधता लाभे सुरक्षा होती सर्व सिद्धी प्राप्त
वज्रपंजर नावाचे म्हणता हे रामकवच
मीळे मान सतत नित्य होई जय मंगल


कथिली रामरक्षा ही जशी स्वप्नी शिवहरे
लिहिली अचूक तशीच महर्षी बुधकौशिके

अलौकिक  त्रिभवनी  माझा प्रभू मनोहारी
राम जणू कल्पतरू हरी हरेक आपत्ती
तरुण सुस्वरूप शक्तिशाली सुकुमार
विशाल कमलनेत्र श्याम वल्कलधारीत
शाकाहारी ब्रह्मचारी तपस्वी नि जितेंद्रिय
दश रथ पुत्र दोघे बंधू आदर्श उभय
धनुर्धारी श्रेष्टतम जीवरक्षी रघूत्तम
राक्षसकुलविनाशी करो आमुचे रक्षण
मार्गी आमुच्या पुढे चालो सदा रामलक्ष्मण
भाता पाठी अक्षय हाती सज्ज चापबाण
खड्गत्राणधनुर्धारी जणू मनीचे इप्सित 
करो रक्षण आमुचे राम हा लक्ष्मणासह
शूरवीर रघुश्रेष्ट प्रबळ पूर्ण पुरूष
ऐश्वर्यवान वेदज्ञ कौसल्यासुत  यज्ञेश 
दाशरथी लक्ष्मणेश आनंददायक राम
काकुस्थ परब्रह्म सीतावर पुरुषोत्तम
नामे ही जपता नित्य भक्ते श्रद्धा बाळगून
लाभे पुण्य निश्चित अधिक अश्वमेधाहून
दुर्वादलश्यामवर्णी  राम पीतांबरधारी
दिव्यनामे स्तुती करिता  त्याची नरा मिळे मुक्ती
लक्ष्मणाग्रज पद्माक्ष राम जनानंददायी
दशरथपुत्र सुंदर श्यामल नि शान्तमूर्ती
ककुस्थवंशी धार्मिक सत्यप्रिय सीतापती
राजेंद्र करुणार्णव विप्रप्रिय गुणनिधी
नमा रघुकुलश्रेष्ट राघव जो रावणारी


रामभद्र रामचंद्र सीतावर वेधस वा
राम नाथ रघुनाथ म्हणा काही आणि नमा

श्रीराम राम रघुनंदन राम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम
श्रीराम राम रणी कठोर राम राम
श्रीराम राम करो रक्षण राम राम


मनाने स्मरण करितो रामचंद्रचरण
वाचेने वर्णन करितो रामचंद्रचरण
मस्तके वंदन करितो रामचंद्रचरण
शरणस्थान माझे रामचंद्रचरण


माता माझी आहे राम पिताही माझा राम
राम स्वामी आहे माझा सखाही आहे राम
माझे असे जे सर्व ते एक दयाळू राम
बाकी काही न मी जाणे जाणे केवळ राम


उजवीकडे लक्ष्मण सीता डाव्या बाजूस
मारुती पुढे ज्याच्या नमस्कार त्या रामास


जनानंददायी रणधुरंधर
कमलनयन रघुकुलवर
दया मूर्तिमंत करुणासागर
तया रामचंद्रा माझा नमस्कार


झंझावाती मनासम वेगवान
जितेंद्रिय वायुतनय महान
वानरप्रमुख अती बुद्धिमान
श्रीरामदूत हनुमंता मी शरण
काव्यशाखेवर कोकीळरूपे
मधुर गुंजन अक्षर रवे
करी वाल्मिकी  राम राम असे
कवी ऋषीस त्या वंदन माझे

हरणकर्ता  सर्व संकटांचा
वर्षावकर्ता सुखसंपदेचा  
आनंद दाता सकल जनांचा
नमस्कार शत त्या  श्रीरामाला


दग्ध करण्या भवबीज अवघे
उपभोग सुख नि भोगण्या मोठे
भयभीत होण्या यमदूत तगडे
गरजा रामनाम उच्च रवाने


विजयी सदा राम राजाधिराज
रामा रमेशा मना माझ्या भज
भितो निशाचर असुरसमाज
ज्याला त्या रामाचे मी पदरज


थोर रामाहुनी नसे कोणी रामाचाची दास मी
जडो चित्त तुझ्या ठायी रामा उद्धार माझा करी


उमे सुमुखे ऐक महाजप मम हा राम राम
विष्णू  सहस्त्र नामासम महामंत्र रामनाम  


असे हे बुधकौशिक विरचित श्रीरामरक्षा स्तोत्र समाप्त
रामकृपेने नारायणाने जे केले मराठीत अनुवादित 

श्री रामचंद्रार्पणमस्तु  !

12 comments:

  1. फार अप्रतिम भावानुवाद केलाय आपण!माझे अनेकानेक प्रणाम आपल्याला.कृपया छोटी पुस्तिका प्रकाशित केल्यास सर्व आबालवृद्धांना उपयोगी होईल.श्रीराम आपल्यावर कृपा धरून आहेच.

    ReplyDelete
  2. मूळ रचना जरी संस्कृत
    तीस गुंफुन मराठी काव्यात
    बहुत केले उपकृत
    समस्त जनांस

    ReplyDelete
  3. सागर गोडबोलेApril 2, 2020 at 6:31 AM

    खूप सुंदर पद्धतीने भावानुवाद केला आहे ! मनःपुर्वक धन्यवाद !

    ReplyDelete
  4. Marathi kutumbani mulana Sanskrit shikwile pahije sundar Annuvad

    ReplyDelete
  5. खूप खूप छान इंग्लिश मीडियम असल्या मुळे अर्थ समजत नव्हता आता तरी बराच समाजाला धन्यवाद

    ReplyDelete
  6. Would have been much better if transalared to meaningful sentence rather than just translating Sanskrit word to Marathi

    ReplyDelete
  7. छान प्रयत्न आहे आचार्य विनोबा भावे यांच्या गीताई ची आठवण झाली, गीताईचा ओघ यमक आणि गोडवा पुढच्या अशाच किंवा याच भाषांतरांच्या ओळीत काही सुधारणा करून आणल्यास घरोघरी रामरक्षा पोहचेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संस्कृत भाषेला जनमानसा पर्यत पोहचवण्याचा तुमचा हा प्रयत्न निश्चितच सराहणीय आहे ,

    ReplyDelete
  8. hya link var chhan arthabodh hoto...

    https://vedicupasanapeeth.org/hn/ramraksha-strot_050549/

    ReplyDelete